सिंहासनावर विराजमान, आशीर्वादासाठी एक हात वरती केलेल्या गणपतीच्या १० फुटी मूर्तीच्या सोंडेचा आधार घेत शंकर मिरदवाड मूर्तीवर मातीचा अखेरचा हात फिरवतोय. नारळाच्या साली आणि प्लास्टर भरलेल्या गोण्या इथे तिथे विखुरल्या आहेत, तिथेच रंगाच्या बाटल्या, रबरी साच्यांची खोकी आणि मूर्तींचे सांगाडे. “काही भागातलं प्लास्टर ऑफ पॅरिस निघालं आहे,” शंकर सांगतो “तेवढं झालं की रंगकामासाठी मूर्ती तयार.”

हैद्राबादच्या जुन्या भागातल्या धूपेट मधल्या मंगलघाट रस्त्यावर तयार किंवा तयार होऊ घातलेल्या अनेक मूर्तींमागे त्यांची बांबू आणि ताडपत्रीची मूर्तीशाळा पटकन दिसतही नाहीये. अरुंद गल्ल्यांमधून गणपतीच्या मूर्ती - इथली सर्वात उंच मूर्ती आहे २१ फुटी – घेऊन जाणारे ट्रक आणि टेम्पो कासवाच्या गतीने सरकतायत. ताडपत्रीने झाकून मंडळात किंवा घरी वाजत गाजत मूर्ती निघाल्या आहेत.

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून शंकर इथे काम करतोय. या शेडचा मालक बाहेरगावी गेलाय, त्याच्या अशा आणखी तीन शेड आहेत, तो सांगतो. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस मी या तिन्ही ठिकाणी गेले तेव्हा २-३ कारागीर सप्टेंबरमध्ये येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या सणासाठी मूर्ती घडवण्यात मग्न होते.

धूलपेटच्या या रंगशाळांमध्ये आणखी एक तुकडी – शिल्पकारांची – जानेवारीमध्ये आली आणि एप्रिलमध्ये परत गेली. दर वर्षी हे असंच चालतं, शंकर सांगतो. “आम्ही आमच्या दुकानात कोलकात्याच्या मूर्तीकाराला बोलावतो,” तो सांगतो. “तो चिनी मातीच्या मूर्ती घडवतो. मोठी मूर्ती असेल तर ती पूर्ण करण्यासाठी मूर्तीकाराला सुमारे २५ दिवस लागतात.”

Shankar painting the bruised part after pasting the chinni mitti
PHOTO • Sumit Kumar Jha
Babban sitting on the hand of a ganesh idol and painting it
PHOTO • Sumit Kumar Jha

डावीकडेः सिंहासनामागच्या देखाव्याला अखेरचा हात मारताना शंकर मिरदवाड. उजवीकडेः बब्बन डावलेकर नांदेडहून आलाय, तिथे तो रिक्षा चालवतो

काही आठवड्यानंतर शंकर आणि इतर कारागिरांचं काम सुरू होतं. तो सगळी प्रक्रिया समजावून सांगतोः मातीच्या मूर्तींच्या आधारे इतर मूर्ती घडवल्या जातात. शंकर आणि त्याचे साथीदार या मूर्तींना रबराचा लेप देतात, जो १० दिवसांनंतर घट्ट बसतो. त्यानंतर त्याच्यावर पातळ गोंद ओतला जातो. या दोन्हीचा मिळून एक साचा बनतो जो मूळ मूर्तीवरून काढून घेतला जातो. या साच्यात नारळाचा काथ्या आणि प्लास्टर भरून नवीन मूर्ती तयार केल्या जातात. उंच मूर्तींसाठी आतमध्ये आधारासाठी बांबू बसवला जातो. १०-१५ मिनिटात प्लास्टर घट्ट होतं. त्यानंतर साचा काढून घेतात. कुठे काही टवका उडाला असेल तर हे कारागीर मातीचा हात फिरवतात. त्यानंतर या मूर्तींना गिऱ्हाइकाच्या मागणीनुसार रंगवून कलाकुसर केली जाते.

अशा पद्धतीने या मूर्तीशाळेत तो आणि त्याचे साथीदार मिळून प्रत्येक साच्याच्या सुमारे ५० मूर्ती घडवत असल्याचं शंकर सांगतो. शंकरच्या मालकाच्या चार मूर्तीशाळांमध्ये मिळून एकूण ४०० मूर्ती घडवल्या जातात. ते फक्त मोठ्या मूर्ती घडवतात, १० फुटी किंवा त्याहून उंच. आणि कलाकुसर आणि कामाप्रमाणे प्रत्येकीची किंमत १५,००० ते ६०,००० इतकी असू शकते.

२९ वर्षे वय असलेला शंकर गेल्या दहा वर्षांपासून मूर्ती घडवण्याचं काम करत आहे. गणपती, दुर्गा आणि इतर देवतांच्या मूर्ती. तो कुंभार समाजाचा आहे आणि घडे घडवणे हे या समाजाचं पिढीजात कौशल्य आहे. “मी १६ वर्षांचा असताना पहिल्यांदा माझ्या चुलत्यांसोबत धूलपेटला आलो. दहावीची परीक्षा झाली आणि सुटी होती,” तो सांगतो. “मी हाताखाली काम करत होतो, इकडून तिकडे सामान न्यायचे किंवा रंग वगैरेसाठी मदत करायची.” तीन महिने राहून त्याने महिन्याला रु. ३,५०० इतकी कमाई केली.

शंकरचं कुटुंब तेलंगणाच्या निजामाबाद जिल्ह्यातल्या वर्णी तालुक्यातल्या वर्णी गावी असतं, हैद्राबादहून १८० किलोमीटर. सुटी संपल्यानंतर बीए करण्यासाठी तो शेजारच्याच महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यातल्या एका कॉलेजमध्ये गेला. “मी दुसऱ्या वर्षी शिक्षण सोडलं,” तो सांगतो. “मी घरात सर्वात थोरला होतो आणि घराची काळजी घेणं माझी जबाबदारी होती.”

शंकरचे तिन्ही भाऊ (त्याला बहीण नाही) मूर्तीकाम करतात. तो आणि त्याची पत्नी स्वाती, जी अर्थार्जनासाठी बिड्या वळते, दोघांच्या दोन मुली आहेत, एक आठ वर्षाची आणि एक तीन वर्षांची. त्याचे आई-वडील त्याच्याकडेच असतात आणि गावी घडे घडवतात.

PHOTO • Sumit Kumar Jha

मूर्तीकाम सुरू आहेः शंकर रबरी साच्याचं काम करतोय (वरती डावीकडे) ज्यामध्ये तो हाताने नारळाचा काथ्या आणि प्लास्टर भरतोय (वरती उजवीकडे). शैलेंद्र सिंग गणपतीच्या मूर्तीचे डोळे रंगवतोय (डावीकडे खाली), मूर्ती रंगवण्यातला सर्वात कठीण भाग. बद्री विशाल शेवटचा हात देताना (उजवीकडे खाली)

कॉलेज सोडल्यावर तो लगेचच धूलपेटला परतला. “इतर मूर्तीकारांना त्यांच्या कामात मदत करत, त्यांचं काम पाहत मीदेखील मूर्ती घडवायला शिकतो. तेव्हापासून मी एक मूर्तीकार म्हणून कामं घेतो, कुर्नूल, गुंटूर, नेल्लोर, विजयवाडा, होसूर आणि बंगलोरमध्ये मी कामं करतो,” तो सांगतो. “पूर्वी १२ महिने काम असायचं, पण आता मात्र आठ महिनेच काम मिळतं. गेल्या ३-४ वर्षांत, बाहेरून मूर्ती यायला लागल्यात त्यामुळे धूलपेटमध्ये मूर्ती बनवण्याचं काम कमी झालंय.”

शंकर सांगतो की त्याने धूलपेटमध्ये दोन महिने मूर्तीकाम केलं तर त्याला महिन्याला ३०,००० रुपये दिले जातात. “मी थेट मालकांकडून कामं घेतो आणि माझं कौशल्य पाहून ते मला कामावर घेतात आणि जास्त पैसे देतात. शिकाऊ कारागीर जे एकाच ठिकाणी राहून कामं करतात त्यांना कमी पैसे मिळतात. मी कमी वेळात आणि झटक्यात कामं पूर्ण करतो,” असा तो दावा करतो.

“इथलं काम झालं की मी गावी जातो आणि मिळेल ते काम करतो. मी रंगकामाचं किंवा खानावळीत वेटरचं कामही करतो. दिवसाला साधारणपणे ६०० रुपये मिळतात,” गणेशाच्या मूर्तीवर सफेद रंग देण्यासाठी हातात स्प्रे गन घेऊन सिंहासनावर उभं राहून शंकर सांगतो.

तेलंगण आणि इतर राज्यातले शंकरसारखे अनेक कामगार गणेशोत्सव आणि दसऱ्याच्या आधी धूलपेटच्या मूर्तीशाळांमध्ये येतात. या काळात ते या मूर्तीशाळांमध्येच मुक्काम करतात. त्यातलाच एक आहे नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातल्या बडूर गावचा बब्बन डावलेकर. गेली पाच वर्षं तो जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इथे येतो आणि नंतर गावी जाऊन रिक्षा चालवण्याचं काम करतो. त्याचे वडीलही रिक्षा चालवतात आणि आई अंगणवाडीत काम करते. “आम्ही सकाळी आठ वाजता काम सुरू करतो ते अगदी मध्यरात्रीपर्यंत किंवा त्यानंतरही ते सुरूच असतं. ठराविक अशी काही वेळ नाही,” तो सांगतो.

बलवीर सिंग, वय ३२ मंगलघाटमध्येच राहतो आणि धूलपेटच्याच दुसऱ्या एका मूर्तीशाळेत गेली १० वर्षं तो काम करतोय. “मला महिन्याला १२,००० रुपये मिळतात. पण पूर्वी आठ महिने काम मिळायचं ते आता सहा महिन्यांवर आलंय,” तो सांगतो. “धूलपेटच्या मूर्तींची शान कमी झालीये कारण महाराष्ट्रातल्या मूर्ती जास्त लोकप्रिय होऊ लागल्या आहेत. बेगम बाजारमधल्या दुकानांमध्ये या मूर्ती स्वस्तात विकल्या जातात. इतर महिने मी हैद्राबादमध्ये रंगकामाचं किंवा सुरक्षारक्षकाचं काम करतो, पण मी हे काम मला सोडायचं नाहीये. मला हे काम करायला मजा येते,” तो सांगतो.

PHOTO • Sreelakshmi Prakash ,  Sumit Kumar Jha

पूर्वीप्रमाणे केवळ माती, प्लास्टर आणि काथ्या पुरेसा नाही, मूर्ती आता गडद रंग लेऊन येतात. वरती, डावीकडेः रंगाच्या छटांसाठी शंकर स्प्रे गनचा वापर करतो. वरती उजवीकडेः ट्रकमध्ये ठेवण्यासाठी मूर्ती सज्ज, तिथून ती मांडवात जाईल. खाली डावीकडेः वाटेमध्ये शेवटचा हात फिरवला जातो आणि काही मूर्ती मात्र धूलपेटच्या रस्त्यांवर गिऱ्हाइकांच्या प्रतीक्षेत आहेत

गणपत मुनीकवरार, वय ३८, धूलपेटच्या एका मूर्तीकाराच्या मालकीच्या मूर्तीशाळेत काम करतात. पावसाळ्यातल्या ओलीमध्ये मूर्ती सुकवण्यासाठी वापरला जाणारा कोळसा सुलगवतयात. ते सँड पेपरने मूर्ती गुळगुळीत करण्याचं आणि मूर्तीचे हात धडाला जोडण्याचं काम करतात.  ते सर्वात प्रथम त्यांच्या मेव्हण्यासोबत इथे आले. आदिलाबाद जिल्ह्याच्या तानूर तालुक्यातल्या दौलताबाद या आपल्या गावी शेतात काही कामं नव्हती तेव्हा ते इथे आले. (आता हा तालुका निर्मल जिल्ह्यात वर्ग करण्यात आला आहे). गावी ते २५० रुपये रोजाने शेतमजुरी करतात आणि खंडाने घेतलेली दोन एकर जमीन कसतात. “मी जुलैच्या मध्यापासून इथे काम करतोय. मला [महिन्याला] १३,००० रुपये मिळतात,” ते सांगतात. “शेतीतून मला वर्षाकाठी ५०,००० ते ६०,००० उत्पन्न मिळतं. आम्ही सोयाबीन, उडीद, मूग तूर लावतो, ज्वारी, हरभरा घेतो... मला काही हे [मूर्तीकाम] आवडत नाही. रात्रीदेखील काम करावं लागतं. मी काही पुढच्या वर्षी येणार नाहीये,” ते सांगतात.

शंकर आणि इतर कारागिरांनी साच्यातून मूर्ती बनवल्यानंतर नक्षीकामाला सुरुवात होते. ते स्वतःही काही रंगकाम करत असले तरी २-३ कारागिरांचा वेगळा गट मूर्ती रंगवतो. एक जण चेहरा, दुसरा हात अशा प्रकारे ते काम करतात. “आम्ही जूनपासून, [गणपती] पूजेच्या दोन महिने आधीपासून,” हातात स्प्रे गन आणि रंगाची बाटली घेतलेला धूलपेटचाच ३१ वर्षांचा बद्री विशाल सांगतो. “एखादी मूर्ती रंगवण्यासाठी अर्धा दिवस [आठ तास] लागतात. एका वेळी आमचं ५-६ मूर्तींवर काम चालू असतं.” बद्रीने गेली १५ वर्षं मूर्ती रंगवतोय. “बाकीचं वर्षभर मी कानपूरहून आणलेले पतंग ठोक बाजारात विकतो,” तो सांगतो. “इथे, मला राखी पौर्णिमेसाठी अर्धा दिवसाची सुट्टी मिळाली, नाही तर दोन महिने आम्हाला बिलकुल सुट्टी मिळत नाही. पेंट कंप्रेसर मशीन [स्प्रे गन] आल्यामुळे रंगकाम सोपं झालंय, पण सगळे बारकावे रंगवण्याचं काम खूपच वेळखाऊ असतं. यंदा मला किती पैसे मिळणार आहेत कल्पना नाही, आम्ही ज्या प्रकारचं काम करतो त्याच्यावर ते अवलंबून असतं.”

डोळे रंगवण्याचं काम सर्वात कठीण असतं. याच मूर्तीशाळेत २० वर्षांचा शैलेंद्र सिंग हातात कुंचला घेऊन बारकाईने गणेशाच्या मूर्तीचे डोळे आणि भाळ रंगवतोय. “दोन वर्षांपूर्वी मी इथे रंगकाम करायला सुरुवात केलीये,” तो सांगतो. “दोन महिने मी हे काम करतो आणि मग अभ्यास [बारावीची परीक्षा पास होण्याचा त्याचा प्रयत्न आहे] आणि माझ्या आई-वडलांना मदत करतो ­[धूळपेटमध्ये त्यांची इडली-डोसाची गाडी आहे]. मला रंगकाम करणारा मुख्य कारागीर व्हायचंय, तो, जो डोळे रंगवतो. मूर्तीचे डोळे रंगवण्याचं काम सर्वात जास्त अवघड आहे, हे अशा रीतीने करावं लागतं की कुठूनही गणपतीकडे पाहणाऱ्या प्रत्येक भक्ताला वाटावं की बाप्पा आपल्याकडेच पाहतोय.”

सुमीत कुमार झा यांच्या अतिरिक्त वार्तांकनासह.

अनुवादः मेधा काळे

Sreelakshmi Prakash

Sreelakshmi Prakash likes to do stories on vanishing crafts, communities and practices. She is from Kerala, and works from Hyderabad.

Other stories by Sreelakshmi Prakash
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Marathi Translations Editor at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale