तरुणपणचे भीमराव आंबेडकर आणि रमाबाईंबद्दलच्या प्रेमाने आणि मायेने ओथंबलेल्या या ओव्या गायल्या आहेत माजलगावच्या मायलेकींनी. ही दोघं अगदी त्यांच्या घरातलीच बनून गेली आहेत

रमाबाई कुंकू लेती, मेणावरी गोल गोल
भीम इमानातून बोलं गं, रमा माझ्या संगं चाल नं

तरुण भीमराव आणि रमाबाई नक्की कसे होते, त्यांचं नातं काय होतं याची झलक पार्वती भादरगेंच्या या ओवीतून आपल्याला मिळते. या ओवीचे दोन अर्थ आहेतः एक, साधासरळ शब्दांमधून प्रतीत होणारा, तरुण पती-पत्नीचं प्रेम दाखवणारा. त्या मागचा दडलेला अर्थ मात्र वेगळा आहे. भीमराव अनेक वर्षं शिक्षणासाठी परदेशात असल्याने दोघांना विरह सहन करावा लागला होता. भीमराव तिथे शिकत होते आणि रमाबाई इथे घरचं सगळं सांभाळत होत्या.

काही ओव्यांमध्ये या मायलेकी बाबासाहेबांचे वडील रामजी सकपाळ किती श्रीमंत होते त्याचे गोडवे गातात. त्यांच्या घरचे अनेक घोडे, त्या घोड्यांसाठी असलेला गोड्या पाण्याचा हौद अशी अनेक वर्णनं त्यांच्या ओव्यांमधून येतात. बाबासाहेब आणि रमाबाईंबद्दल वाटणारं प्रेम आणि अभिमानातून आलेल्या काही ओव्या  खरं तर वास्तवाला धरून नाहीतही.

भीमराव आणि रमाबाईंचं लग्न कसं झालं? खरंच ते कसं असेल?

१९०६ साली जेव्हा दोघांचं लग्न झालं तेव्हा दोघंही पोरवयात होते आणि त्या काळी तशीच रीतही होती. चौदा वर्षांचे भीमराव मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले होते आणि वधू, रमी वळंगकर केवळ नऊ वर्षांची होती. रामजी सकपाळांनी आपल्या लेकासाठी मुलगी निवडली. कोकणातल्या वनंदगावातल्या गरीब घरातली ही मुलगी. तिचे वडील हमाली करायचे. रमीचे आई-वडील दोघं एका पाठोपाठ तरुण वयातच वारले आणि त्यानंतर ती आणि तिचे धाकटे भाऊ-बहीण मामाच्या घरी रहायला आले. मुंबईतल्या भायखळा भाजी मंडईतल्या चाळीत हा मामा राहत असे. भीमराव आणि रमीचं लग्न रात्रीच्या वेळी इथेच मंडईत लागलं. भाजी विक्रेते आणि खरीददार नसल्याने मंडई रिकामीच होती.

लग्नानंतर रमीचं नाव रमाबाई करण्यात आलं. भीमराव त्यांना लाडाने ‘रमू’ म्हणत असत. तिच्यासाठी ते नेहमीच ‘साहेब’ होते. नवऱ्यावर असलेलं प्रेम, आदर आणि भक्ती असं सगळंच या शब्दातून व्यक्त होत असे. लहानपणी हलाखीत राहिलेल्या रमीला लग्नानंतर देखील काबाडकष्टच करावे लागले. भीमराव शिक्षणासाठी परदेशी गेले. या दोघांना पाच मुलं झाली, त्यातली चार बालपणीच गेली. भीमरावांच्या अनुपस्थितीत जिवलगांच्या, त्यातही आपल्या पोटच्या पोरांच्या जाण्याचं घोर दुःख रमाबाईंनी अगदी एकटीने सहन केलं.

बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या भीमनगरमधल्या पार्वती भादरगे आणि त्यांची लेक रंगू पोटभरे यांनी गायलेल्या २२ ओव्यांची सुरुवातच एका सुंदरशा विचाराने होतेः “बाई तुझा माझा गळा, येऊ दे एक सारं  गं, येऊ दे एक सारं गं, जशी गंगेतली धार गं”. भीमराव आणि रमाबाई घरी येणार आहेत आणि त्यांच्यासाठी पुरणाची पोळी बनवणार असल्याचं पुढे ओवीत गायलंय.

Dr. Babasaheb Ambedkar with Ramabai Ambedkar in 1934
PHOTO • Courtesy: Wikipedia
At their Rajagriha bungalow, Bombay in February 1934. From left:  son Yashwant, Dr. Ambedkar, Ramabai, Babasaheb's brother's wife Laxmibai, nephew Mukundrao, and their dog Tobby
PHOTO • Courtesy: Wikipedia

डावीकडेः १९३४ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई आंबेडकर. उजवीकडेः १९३४ साली फेब्रुवारी महिन्यात मुंबईच्या राजगृह बंगल्यात. डावीकडूनः मुलगा यशवंत, डॉ. आंबेडकर, बाबासाहेबांची वहिनी - लक्ष्मीबाई, पुतण्या मुकुंदराव आणि त्यांच्या लाडका कुत्रा टोबी

पुढे पार्वतीबाई आणि रंगूताई अगदी अभिमानाने रामजी सकपाळांच्या घोड्यांबद्दल गातात. बाबासाहेब चालवायचे ती हजाराची घोडी, तिच्यावरची तीनशे रुपयांची झूल... मग त्या म्हणतात साक्षात लक्ष्मीदेखील भीमरावांचा वाडा कुठे ते विचारत विचारत येते. मोठा वाडा, श्रीमंती आणि समृद्धीची गाणी जरी या बाया गात असल्या तरी प्रत्यक्षात मात्र हे कुटुंब अजिबातच श्रीमंत नव्हतं. रामजी सकपाळ सुभेदार म्हणून निवृत्त झाले होते आणि हे कुटुंब लोअर परळच्या दाबक चाळीत रहायचं. ओवी गाताना या दोघींना भीमराव म्हणजे गुलाबाचं फूल वाटतात. लग्नाच्या वेळी बाशिंग बांधलेले भीमराव आणि रमाबाई त्यांना दिसतात.

दुसऱ्या एका ओवीत असं गायलंय की जवानीची १२ वर्षं जात्यावर दळणं करण्यात गेली आहेत. जातं ओढून पाठ घामाने ओली व्हायची. पण मग ती रमाईच होती जी हे कष्ट काढण्याचं बळ द्यायची. जणू लहानपणी अफूमध्ये जायफळाची गुटी द्यायची.

भीमराव परदेशी असताना केलेला त्याग आणि स्वाभिमान यामुळे रमाबाई लोकांच्या मनात रमाई झाल्या. कितीही खडतर परिस्थिती आली तरी त्यांनी आप्तेष्टांकडून कधीही पैसे घेतले नाहीत. एकदा रमाबाई आपल्या एका मैत्रिणीकडे मुक्कामी रहायला गेल्या होत्या. ही मैत्रीण बालकांचा आश्रम चालवत असे. सरकारकडून येणारा धान्यसाठा यायला विलंब झाल्यामुळे मुलं उपाशी असल्याचं त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आपल्याकडचे सोन्याचे दागिने मैत्रिणीच्या हाती सुपूर्द केले. ते विकून किंवा गहाण ठेवून जमेल तितकं धान्य आणता यावं म्हणून. ही पोरं त्यांना कृतज्ञतेतून रमाई म्हणायची. आणि आजही हेच नाव लोकांच्या मनात आहे.

एका ओवीत भीमराव अगदी तान्हे आहेत आणि माहेरात गेल्यावर त्यांच्या पाळण्याला झोका देईन अशी सुंदर कल्पना केली आहे तर दुसऱ्या एका ओवीत भीमराव आपले भाऊ आणि माहेरात विसाव्याला रमाई आपली भावजय असल्याचं गायलं आहे.

ओव्यांच्या या संचातल्या शेवटच्या ओवीत दोघी अगदी आनंदाने गातात की घर पाहुण्यारावळ्यांनी भरून गेलंय आणि त्या ‘जय भीम’ म्हणून आंबेडकरांचा जयघोष करतायत.

An old photo of Parvati Bhadarge
PHOTO • Vinay Potbhare
Rangu Potbhare in Majalgaon's Bhim Nagar on Ambedkar Jayanti in 2021
PHOTO • Vinay Potbhare

डावीकडेः पार्वती भादरगेंचा एक जुना फोटो. उजवीकडेः रंगू पोटभरे २०२१ साली माजलगावच्या भीमनगरमध्ये आंबेडकर जयंती रोजी

पार्वती भादरगे आणि रंगू पोटभरेंच्या आवाजात या ओव्या ऐका

बाई तुझा माझा गळा, येऊ दे एक सारं  गं
येऊ दे एक सारं गं, जशी गंगेतली धार गं

माझ्या घरला पाव्हणा, शेजी म्हणिती कुठले
माझे आंबेडकर बाबाचे गं, टांगे रस्त्याला सुटले नं

बाई पुरणाची पोळी, लाटिते घाई घाई
माझ्या घरला पाहुणे गं, भीमासंगं रमाबाई नं

रमाबाई कुंकू लेती, मेणावरी गोल गोल
भीम इमानातून बोलं गं, रमा माझ्या संगं चाल नं

बाई घोड्यावरले सोळा, बाई पायदळी किती
माझं रामजी हे पिता गं, सून पाह्या गेले राती नं

बाई घोड्यावरी सोळा, काई पायंदळी मोजा
माझा रामजी त्यो पिता गं, सून पाह्या गेला राजा नं

घोड्यावरी राम राम, कोण सोयरा ढेकीचा
माझ्या लाडक्या रमाचा गं, पती लाडक्या लेकीचा नं
माझे आंबेडकर बाबा गं, पती लाडक्या लेकीचा नं

अशी वाजत गाजत, उन्हाचं काय येतं, शिरी बाशिंग सोन्याचं
रामजी पित्याच्या नं घरी गं, लगन भिमाचं लागतं नं

घरी आली लक्ष्मी, आली उठत बसत
आली उठत बसत गं, वाडा भिमाचा पुसत नं

बाई मानाचं गं कुंकू, लावा जोत्याच्या पायरी गं
लाडकी रमाबाई गं, मानकरीण नाही घरी गं

बाई सवाषीन ठिवा, आला पाव्हुणा दुरुन
भीम सख्याची ही राणी गं, आणा खंदील लावून गं

बाई बाजार भरला, बाई हजार किल्ल्याचा
माझा आंबेडकर बाबा, वळखू नाही आला गं,
भीम बारीक शेल्याचा नं

बाई दवुत लेखणी, आहे पलंगाच्या हाताला
मीरा पुसती भाचाला गं, किती परगणा जितिला

बाई दळण दळीलं, पीठ भरिते गुंडीत
माझा आंबेडकर बाबाले गं, तान्ह्याले दहेलीत गं

बाई हजाराची घोडी, पाणी पेईना वढ्याला
रामजी पित्यानं लाविले गं, गोड हौद वाड्याला नं

बाई हजाराची घोडी, तिला तिनश्याची झूल
माझा आंबेडकर बाबा गं, वरी गुलाबाचं फूल नं

बाई जातं वढीतानी, माझ्या मुठीमंदी बळ
रमा मावुलीनं देलंय गं, अफुमंदी जायफळ नं

अशी जातं वढिताना, अंगाचं कर पाणी
बारा वर्साची जानी गं, लावा जात्याच्या कारणी गं

बाई माहेरा जाईन, माहेराचा डौल कसा
भाव आणि बोल भाचा, आवडीचा भीम सखा गं,
आत्याबाई खाली बसा नं

बाई माहेरा जाईन, मला ईसावा कशाचा
समोर पाळणा भीमाचा गं, झोका देते हावसंचा नं

बाई माहेरी जाईन, माहेरी माय बाई
लाडकी रमाबाई गं, ईसाव्याला भावजई नं

माझ्या घरला पाहुणे, बसायला ठायी ठायी
माझे आंबेडकर बाबाला गं, जय भीम केलाय बाई गं


कलांवतः पार्वती भादरगे (आई), रंगू पोटभरे (मुलगी)

गावः माजलगाव

वस्तीः भीमनगर

तालुकाः माजलगाव

जिल्हाः बीड

जातः नवबौद्ध

व्यवसायः पार्वती भादरगे शेती आणि शेतमजुरी करायच्या. रंगू पोटभरे यांनी देखील काही वर्षं घरची शेती केली आहे.

पोस्टरः ऊर्जा

मोलाची मदत केल्याबद्दल राजरत्न साळवे आणि विनय पोटभरे यांचे विशेष आभार.

हेमा राइरकर आणि गी पॉइत्वाँ यांनी सुरू केलेल्या जात्यावरच्या ओव्या या मूळ प्रकल्पाबद्दल वाचा.

अनुवादः मेधा काळे

Namita Waikar is a writer, translator and Managing Editor at the People's Archive of Rural India. She is the author of the novel 'The Long March', published in 2018.

Other stories by Namita Waikar
PARI GSP Team

PARI Grindmill Songs Project Team: Asha Ogale (translation); Bernard Bel (digitisation, database design, development and maintenance); Jitendra Maid (transcription, translation assistance); Namita Waikar (project lead and curation); Rajani Khaladkar (data entry).

Other stories by PARI GSP Team
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Marathi Translations Editor at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale