मणिरामचा जीव वाचवला होता वत्सलाने.

“आम्ही पांडव धबधब्यापाशी गेलो होतो,” मणिराम सांगू लागतो. “वत्सला गेली होती चरत चरत. मी तिला परत आणायला म्हणून गेलो आणि अचानक एक वाघ आला.”

मणिरामने मदतीसाठी पुकारा केला, “ती पळत पळत आली आणि आपला पुढचा पाय तिने उंचावला. म्हणजे मला तिच्या पाठीवर बसता आलं असतं. मी पाठीवर बसल्यानंतर तिने आपले पाय जोरात जमिनीवर आपटले आणि काही झाडं तोडून टाकली. वाघ? भाग गया,” सुटकेचा निःश्वास टाकत मणिराम माहूत सांगतो.

पन्ना व्याघ्र प्रकल्पातली ही वत्सला १०० वर्षांहून मोठी असल्याचं सांगितलं जातं. जगातली हयात असलेली सगळ्यात वयोवृद्ध हत्तीण आहे ती. “काही जण सांगतात ती ११० वर्षांची आहे, काही म्हणतात ११५. आणि खरंच असेल त्यांचं म्हणणं,” गोंड आदिवासी मणिराम सांगतो. १९९६ पासून तो तिचं सगळं पाहतोय.

वत्सला आशियाई हत्तीण आहे. केरळ आणि मध्य प्रदेशची रहिवासी आहे. ती आता फार प्रेमळ झालीये पण तरुणपणी एकदम धडाकेबाज होती ती, मणिराम सांगतो. अगदी आजही दिसायला आणि ऐकायला कमी येत असलं तरीही कुठे काही धोका असेल तर त्याची पहिली चाहूल वत्सलालाच लागते.

मणिरामच्या सांगण्यानुसार तिची घ्राणेंद्रियं अजूनही उत्तम काम करतायत आणि त्यामुळेच इतर कुणी जनावर आसपास आलं तर तिला ते लगेच समजतं. अशा वेळी ती लगेच सगळ्या कळपाला सूचना देते आणि सगळे जण एका ठिकाणी गोळा होतात. पिलं सगळ्यात आतमध्ये. “एखाद्या प्राण्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर सगळे मिळून त्याला पळवून लावतात. सोंडेने वाटेतले दगड, फांद्या उचलून फेकतात,” मणिराम सांगतो आणि कौतुकाने म्हणतो, “पहले बहुत तेझ थी.”

PHOTO • Priti David
PHOTO • Priti David

डावीकडेः वत्सला आणि तिचा माहूत मणिराम, पन्ना व्याघ्र प्रकल्प, मध्य प्रदेश. उजवीकडेः वत्सला जगातली सगळ्यात वयोवृद्ध हत्तीण आहे. तिचं वय १०० वर्षांहून जास्त आहे

PHOTO • Sarbajaya Bhattacharya
PHOTO • Sarbajaya Bhattacharya

वत्सला आशियाई हत्तीण आहे. तिचा जन्म केरळमध्ये झाला आणि १९९३ साली तिला होशंगाबादला (आता नर्मदापुरम) आणण्यात आलं

वत्सलाला वन्यप्राण्यांची भीती वाटत नाही आणि मणिरामलाही नाही. अगदी वाघाचीही नाही. २०२२ साली प्रकाशित झालेल्या या अहवालानुसार पन्नामध्ये ५७ ते ६० वाघ आहेत. “हाथी के साथ रहते थे तो टायगर का कोई डर नही रहता था,” तो सांगतो.

आम्ही त्यांच्याशी पन्नाच्या हिनौता गेटपाशी बोलत होतो. एकूण १० हत्तींचा कळप सकाळच्या पहिल्या खुराकाची वाट पाहत होता. त्यात एक पिलू पण होतं. वत्सला एका झाडाखाली उभी होती. मणिराम आम्हाला तिथे घेऊन जातो. पायात साखळदंड घालून तिला जमिनीत रोवलेल्या एका ओंडक्याला बांधून घातलं होतं. तिच्या शेजारी कृष्णकली आपल्या दोन महिन्यांच्या पिलासह उभी होती.

वत्सलाला कधी पिलं झाली नाहीत. “पण ती कायम दुसऱ्या हत्तिणींच्या पिलांना सांभाळते. दूसरी की बच्चियां बहुत चाहती है,” हसत हसत मणिराम सांगतो. “ती त्या पिलांसोबत खेळत असते.”

*****

वत्सला आणि मणिराम दोघंही इथे पन्नामध्ये स्थलांतर करून आलेत. मध्य प्रदेशाच्या वायव्येला असणाऱ्या या जिल्ह्यातला ५० टक्क्यांहून अधिक भाग वनांनी आच्छादलेला आहे. वत्सलाचा जन्म केरळमध्ये झाला आणि त्यानंतर तिला होशंगाबादला (आता नर्मदापुरम) आणण्यात आलं. मणिरामचा जन्म होशंगाबादचा. तिथेच त्यांची भेट झाली.

“मला हत्ती कायमच आवडलेत,” पन्नाशीचा मणिराम सांगतो. त्याच्या कुटुंबातल्या कुणीही प्राण्यांची देखभाल केलेली नाही. त्याचे वडील पाच एकरात शेती करायचे आणि मणिरामचा मुलगाही शेतीच करतो. “आम्ही गहू, चना आणि तीळ घेतो,” तो सांगतो.

वत्सलाचं काय सुरू आहे पहा

वत्सला १०० वर्षांहून मोठी असल्याचं सांगितलं जातं. जगातली हयात असलेली सगळ्यात वयोवृद्ध हत्तीण आहे, तिचा माहूत गोंड आदिवासी मणिराम सांगतो

होशंगाबादला वत्सला आली तेव्हा मणिराम एका माहूताच्या हाताखाली काम करत होता. “ट्रकमध्ये लाकडं लादायचं काम तिच्याकडून करून घेत असत,” तो सांगतो. दोनेक वर्षांनी वत्सलाची रवानगी पन्नाला झाली. “त्यानंतर काही वर्षांनी पन्नातल्या माहुताने बदली करून घेतली आणि त्याचं पद सोडलं. म्हणून मग त्यांनी मला बोलावलं,” मणिराम सांगतो. तेव्हापासून तो पन्ना व्याघ्र प्रकल्पातल्या आपल्या दोन खोल्यांच्या घरात राहतो आणि या वय होत चाललेल्या हत्तिणीची काळजी घेतो.

वत्सलाची पूर्ण जबाबदारी वनखात्याची आहे. मणिराम मात्र इथला कायमस्वरुपी कर्मचारी नाही. “जब शासन रिटायर करा देंगे, तब चले जायेंगे,” तो म्हणतो. महिना २१,००० रुपयांचा करार दर वर्षी नव्याने केला जातो. अजून किता वर्षं आपण हे काम करू शकू याची आता त्याला शाश्वती वाटत नाही.

“पहाटे पाच वाजता माझा दिवस सुरू होतो,” मणिराम सांगतो. “मी दलिया शिजवतो, वत्सलाला खाऊ घालतो आणि जंगलात पाठवून देतो.” तिथे ती इतर हत्तींसोबत चरायला जाते. वीसेक इतर हत्ती असल्याचं मणिरामचं म्हणणं आहे. त्यानंतर तो तिची राहण्याची जागा साफ करून तिचं रात्रीचं जेवण तयार करून ठेवतो. १० किलो दलिया. मग तो स्वतःसाठी जेवण बनवतो. रोटी किंवा चावल. सगळे हत्ती चार वाजेपर्यंत परत येतात. त्यानंतर वत्सलाला अंघोळ घालायची आणि रात्रीचं जेवण द्यायचं. तेव्हा कुठे दिवस संपतो.

“तिला भात खायला आवडायचं. केरळमध्ये असताना तेच तिचं खाणं होतं,” मणिराम सांगतो. पण १५ वर्षांपूर्वी तिचं खाणं बदललं. राम बहादुर नावाच्या हत्तीने तिच्यावर हल्ला केला. तिचं वय तेव्हा ९०-१०० असावं. तिला पाठीला आणि पोटाला जखमा झाल्या. डॉक्टरांना बोलावण्यात आलं. “डॉक्टरसाहेब आणि मी मिळून तिची काळजी घेतली,” मणिराम सांगतो. त्या हल्ल्यानंतर ती फार अशक्त झाली. त्यामुळे तिच्या आहारात बदल करण्याची गरज भासली. शक्ती यावी म्हणून.

PHOTO • Priti David
PHOTO • Sarbajaya Bhattacharya

डावीकडेः वनखात्यामध्ये मदतनीस असलेला आशीष हत्तींसाठी दलिया बनवतोय. उजवीकडेः मणिराम वत्सलाला नाश्त्यासाठी घेऊन जातोय

PHOTO • Priti David
PHOTO • Sarbajaya Bhattacharya

१५ वर्षांपूर्वी राम बहादुर नावाच्या हत्तीने ९०-१०० वर्षांच्या वत्सलावर हल्ला केला. तिला पाठीला आणि पोटाला जखमा झाल्या. डॉक्टरांना बोलावण्यात आलं. ‘त्या हल्ल्यानंतर ती फार अशक्त झाली. त्यामुळे तिच्या आहारात बदल करण्याची गरज भासली. शक्ती यावी म्हणून,’ मणिराम माहूत सांगतो

त्यानंतर तिला कामावरून निवृत्त करण्यात आलं. म्हणजे तिच्या कामाचं स्वरुप आता बदललं. ट्रकमध्ये लाकडं लादण्याचं काम बंद झालं. आता जंगलात टेहळणी करायची आणि वाघ कुठे आहे ते पाहायला मदत करण्याची जबाबदारी तिच्यावर आली.

या दोघा जिवाभावाच्या मित्र-मैत्रिणीला एकमेकांशिवाय करमत नाही. मणिराम सांगतो, “मी घरी असतो तेव्हा तिची सारखी आठवण येते. ती काय करत असेल, नीट खाल्लं असेल का असं सारखं मनात येत राहतं...” वत्सलाचीही तीच गत आहे. माहूत जर आठवड्याहून जास्त काळ रजेवर असेल तर वत्सलाबाई खाण्याला तोंड लावत नाहीत.

“उस को पता चलता है की अब महावत साब आ गये,” मणिराम सांगतो. तो गेटपाशी, ४००-५०० मीटरवर उभा असेल तर ती सोंड उंचावून जोरदार चीत्कार करून तो आल्याची खबर देते.

गेल्या इतक्या वर्षांमध्ये त्यांच्यातली मैत्री जास्तच घट्ट होत गेलीये. “मेरी दादी जैसी लगती है,” मणिराम म्हणतो. आणि तोंडभरून हसू त्याच्या चेहऱ्यावर फुलतं.

Sarbajaya Bhattacharya

Sarbajaya Bhattacharya is a Senior Assistant Editor at PARI. She is an experienced Bangla translator. Based in Kolkata, she is interested in the history of the city and travel literature.

Other stories by Sarbajaya Bhattacharya
Editor : Priti David

Priti David is the Executive Editor of PARI. She writes on forests, Adivasis and livelihoods. Priti also leads the Education section of PARI and works with schools and colleges to bring rural issues into the classroom and curriculum.

Other stories by Priti David
Photographs : Sarbajaya Bhattacharya

Sarbajaya Bhattacharya is a Senior Assistant Editor at PARI. She is an experienced Bangla translator. Based in Kolkata, she is interested in the history of the city and travel literature.

Other stories by Sarbajaya Bhattacharya
Photographs : Priti David

Priti David is the Executive Editor of PARI. She writes on forests, Adivasis and livelihoods. Priti also leads the Education section of PARI and works with schools and colleges to bring rural issues into the classroom and curriculum.

Other stories by Priti David
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Marathi Translations Editor at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale