तेवीस वर्षीय भक्‍ती कास्‍टेसाठी आपलं कुटुंब हे सर्वस्‍व होतं. दहावीनंतर तिने शाळा सोडली आणि ती नोकरी करायला लागली. धाकट्या बहिणी होत्‍या, त्‍यांचं शिक्षण सुरू राहायला हवं होतं. एका कंपनीत ती सहाय्‍यक म्हणून काम करत होती, अथक राबत होती. तिचे वडील आणि मोठा भाऊदेखील दिवसरात्र काम करत होते. त्‍यांना श्‍वास घेण्‍यासाठी फुरसत मिळावी, यासाठी भक्‍ती त्‍यांच्‍या उत्‍पन्‍नाला हातभार लावत होती. आपल्‍या कुटुंबासाठी ती हे सारं करत होती. मे २०२१ पर्यंत असं चालू होतं.

त्‍यानंतर मात्र ज्‍यांच्‍यासाठी काम करावं, असं कुटुंबच राहिलं नाही.

१३ मे २०२१ या दिवशी भारतीच्‍या कुटुंबातले पाच जण अचानक बेपत्ता झाले. मध्य प्रदेशातल्‍या देवास जिल्ह्यातील नेमावर गावातलं हे कुटुंब. तिथेच ही घटना घडली होती. बेपत्ता झालेल्‍यांमध्ये भारतीच्‍या दोन बहिणी होत्‍या, १७ वर्षांची रुपाली आणि १२ वर्षांची दिव्‍या. भारतीची आई होती, ममता (४५). सोबत पूजा (१६) आणि पवन (१४) ही भारतीची दोन चुलत भावंडंही होती. ‘‘कोणाशीच संपर्क होईना आमचा,’’ भारती सांगते. ‘‘रात्र झाली तरी त्‍यांच्‍यापैकी कोणीही घरी परतलं नाही आणि मग मात्र आम्ही घाबरलो.’’

भारतीने पोलिसात आपल्‍या कुटुंबातले पाच जण बेपत्ता झाल्‍याची तक्रार नोंदवली, पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

एका दिवसाचे दोन दिवस झाले, दोनाचे तीन. भारतीचे बेपत्ता कुटुंबीय घरी आलेच नाहीत. एकेक दिवस जात होता तसतसं त्‍यांचं घरात नसणं अंगावर यायला लागलं. भारतीच्‍या पोटात पडलेला खड्डा वाढायला लागला. घरातली शांतता अधिकच गडद झाली.

काहीतरी वाईट घडलंय असं सारखं मनात यायला लागलं.

Five of Bharti's family went missing on the night of May 13, 2021 from their village, Nemawar in Madhya Pradesh’s Dewas district.
PHOTO • Parth M.N.

मध्य प्रदेशातल्‍या देवास जिल्ह्यातल्‍या नेमावर गावातून १३ मे २०२१ च्‍या रात्री भारतीच्‍या कुटुंबातले पाच जण बेपत्ता झाले

त्‍यानंतर पाच नाही, दहा नाही, तब्‍बल ४९ दिवसांनी, २९ जून २०२१ ला पोलिसांनी ती दुःखद बातमी आणली… सुरेंद्र चौहान यांच्‍या शेतातून पाच मृतदेह खणून काढले गेले आहेत. गावात वजन असणारे राजपूत चौहान उजव्‍या हिंदू गटांशी जोडलेले आहेत आणि भाजपचे त्‍या मतदारसंघाचे आमदार आशीष शर्मा यांच्‍या जवळचे आहेत.

‘‘हे असं काहीतरी घडलेलं असणार असं आम्हाला मनोमन वाटत होतंच, पण तरीही प्रचंड धक्‍का बसला,’’ भारती सांगते. भारतीचं कुटुंब गोंड जमातीचं आहे. ‘‘एका रात्रीत तुमच्‍या कुटुंबातले पाच जण तुम्‍ही गमावता तेव्‍हा नेमकं काय वाटतं, ते नाही मला शब्‍दांत सांगता येणार. आम्हा सगळ्यांना काहीतरी जादू व्‍हावी, असंच वाटत होतं.’’

नेमावरमध्ये एका आदिवासी कुटुंबाने एका रात्रीत आपले पाच सदस्‍य गमावले होते.

या हत्‍याकांडाचे संशयित म्हणून पोलिसांनी सुरेंद्र आणि त्‍याच्‍या सहा साथीदारांना अटक केली.

*****

मध्य प्रदेशात आदिवासींची लोकसंख्या जवळपास २१ टक्‍के आहे. त्‍यात अनेक जमातींसह गोंड, भिल्‍ल आणि सहरिया या जमाती आहेत. आदिवासींची संख्या अधिक असली, तरी ते या राज्‍यात सुरक्षित मात्र नाहीत. राष्‍ट्रीय गुन्‍हे नोंदणी विभागाने (National Crime Records Bureau - NCRB) प्रसिद्ध केलेल्‍या ‘क्राइम इन इंडिया २०२१’ या अहवालानुसार २०१९ ते २०२१ या काळात अनुसूचित जमातींवरच्‍या अत्‍याचाराचे सर्वाधिक गुन्‍हे मध्य प्रदेशात नोंदले गेले आहेत.

२०१९ मध्ये राज्‍यात अनुसूचित जमातींवरच्‍या अत्‍याचाराचे १९२२ गुन्‍हे नोंदले गेले. दोन वर्षांनी ही संख्या २६२७ झाली. ही वाढ ३६ टक्‍के आहे आणि वाढीची संपूर्ण देशाची सरासरी आहे १६ टक्‍के!

२०२१ मध्ये अनुसूचित जमातींवरच्‍या अत्‍याचाराचे ८८०२ गुन्‍हे संपूर्ण देशभरातून नोंदवले गेले होते. त्‍यापैकी मध्य प्रदेशातले होते २६२७, म्हणजे ३० टक्‍के, दिवसाला सात. ज्‍या अत्‍याचारांच्‍या कहाण्‍या भयानक असतात, त्‍यांच्‍या बातम्‍या होतात; पण रोजची दहशत, धमक्‍या, अपमान यांची कुठे साधी नोंदही होत नाही.

'I can’t describe what it's like to lose five members of the family in one night,' says Bharti from a park in Indore.
PHOTO • Parth M.N.

इंदूरमधल्‍या एका बागेत बसून बोलताना भारती सांगते, ‘एका रात्रीत तुमच्‍या कुटुंबातले पाच जण तुम्‍ही गमावता तेव्‍हा नेमकं काय वाटतं, ते नाही मला शब्‍दांत सांगता येणार’

जागृत आदिवासी दलित संघटनेच्‍या माधुरी कृष्‍णस्‍वामी म्हणतात की, अनुसूचित जमातींच्‍या विरोधात होणार्‍या अत्‍याचारांची संख्या एवढी मोठी आहे की कार्यकर्त्यांना त्‍यावर नजर ठेवणं, त्‍यांची नोंद ठेवणं अशक्‍य होऊन जातं. ‘‘महत्त्वाची गोष्ट ही की, त्‍यातले काही भयंकर गुन्‍हे भाजप नेत्‍यांच्‍या ‘राजकीय जागिरी’मध्ये घडलेले आहेत,’’ त्‍या सांगतात.

या वर्षी जुलैमध्ये राज्‍याच्‍या सिधी जिल्ह्यातला पाहाणार्‍याला अस्‍वस्‍थ करणारा एक व्हिडीओ व्‍हायरल झाला: दारूच्‍या नशेत असणारा परवेश शुक्‍ला एका आदिवासीच्‍या अंगावर लघवी करतो आहे, असं या व्हिडीओत दिसत होतं. व्हिडीओ सोशल मीडियावर आल्‍यावर लगेचच भाजपचा कार्यकर्ता असलेल्‍या शुक्‍लाला अटक करण्‍यात आली.

पण ज्‍या घटनांच्‍या बाबतीत लोकांमध्ये संताप निर्माण करणारा असा एखादा व्हिडीओ नसतो, त्‍या वेळेला मात्र कायदा इतकं जलद काम करत नाही. ‘‘आदिवासी जमाती विस्‍थापित होत राहातात किंवा एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जात राहातात,’’ कृष्‍णस्‍वामी सांगतात. ‘‘आणि त्‍याचमुळे असुरक्षित बनतात. शिवाय, सामर्थ्यशाली, प्रभावशाली असलेल्‍या तथाकथित ‘उच्‍च’ जाती अमानवी वागल्‍या, आदिवासींवर त्‍यांनी हल्‍ले केले तरी कायदा त्‍यांना काहीच करत नाही.’’

नेमावरमधलं भारतीच्‍या कुटुंबाचं हत्‍याकांड घडलं होतं ते तिच्‍या बहिणीच्‍या, रूपालीच्‍या, सुरेंद्रबरोबर असणार्‍या तथाकथित प्रेमप्रकरणामुळे.

रूपाली आणि सुरेंद्र बरेच दिवस एकमेकांच्‍या प्रेमात होते, एकमेकांना भेटत होते. पण एक दिवस अचानक सुरेंद्रने दुसर्‍याच एका मुलीशी आपला साखरपुडा होणार असल्‍याचं सांगितलं आणि हे नातं संपलं. रूपालीला खूप आश्‍चर्य वाटलं. ‘‘तू अठरा वर्षाची झालीस की आपण लग्‍न करू, असं आश्‍वासन तिला सुरेंद्रने दिलं होतं,’’ भारती सांगते. ‘‘पण खरं तर त्‍याला केवळ शारीरिक संबंध हवे होते. त्‍याने तिचा वापर केला आणि लग्‍न मात्र दुसर्‍याच कोणाशी तरी करायचं ठरवलं.’’

रूपाली चिडली, तिने त्‍याला सोशल मीडियावर हे सगळं उघड करण्‍याची धमकी दिली. शांतपणे बोलू आणि यावर तोडगा काढू असं सांगून सुरेंद्रने एक दिवस तिला शेतावर भेटायला बोलावलं. ती त्‍याला भेटायला गेली तेव्‍हा तिच्‍यासोबत पवनही होता, पण सुरेंद्रच्‍या मित्राने त्‍याला लांबच रोखलं. शेतातल्‍या एका निर्मनुष्य जागी हातात लोखंडी सळई घेऊन सुरेंद्र रूपालीची वाट बघत होता. रूपाली त्‍याला भेटायला जाताच त्‍याने तिच्‍या डोक्‍यात जोरात ती सळई घातली आणि तिथेच तिला मारून टाकलं.

त्‍याने मग पवनला निरोप पाठवला की, रूपालीने आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केला आहे आणि तिला हॉस्पिटलमध्ये न्‍यायला हवं. घरी असलेल्‍या रूपालीच्‍या आईला आणि बहिणीला बोलाव, असंही त्‍याने सांगितलं. खरं तर रूपालीला आपण भेटायला बोलावलंय हे माहिती असणार्‍या त्‍या संपूर्ण कुटुंबालाच सुरेंद्र मारून टाकणार होता. एकेक करून त्‍याने सर्वांना मारलं आणि तिथेच शेतात पुरून टाकलं. ‘‘संपूर्ण कुटुंबाला मारून टाकण्‍याचं हे कारण आहे का?’’ भारती सवाल करते.

From 2019 to 2021, there was a 36 per cent increase in atrocities against STs in Madhya Pradesh.
PHOTO • Parth M.N.

२०१९ ते २०२१ या काळात मध्य प्रदेशात अनुसूचित जमातींवरील अत्‍याचारांमध्ये ३६ टक्‍के वाढ झाली

सुरेंद्रच्‍या शेतातून मृतदेह बाहेर काढले तेव्‍हा रूपाली आणि पूजाच्‍या अंगावर कपडे नव्‍हते. ‘‘आम्‍हाला संशय आहे की त्‍याने मारून टाकण्‍याआधी त्‍या दोघींवर बलात्‍कार केला,’’ भारती म्हणते. ‘‘या प्रकरणामुळे आमची आयुष्यंच बरबाद झाली.’’

राष्‍ट्रीय गुन्‍हे नोंदणी विभागाच्‍या अगदी ताज्‍या आकडेवारीनुसार, मध्य प्रदेशात २०२१ मध्ये बलात्‍काराच्‍या ३७६ घटना घडल्‍या. सरासरी दिवसाला एकापेक्षा अधिक. यापैकी १५४ घटना अल्पवयीन मुलींच्‍या बाबतीत घडलेल्‍या होत्‍या.

‘‘याआधी आम्ही फार चांगलं आयुष्य जगत होतो असं नाही, पण निदान आम्ही एकमेकांना एकमेक होतो,’’ भारती म्हणते. ‘‘एकमेकांसाठी काम करायचो, राबायचो.’’

*****

‘उच्‍च’ जाती आदिवासींवर अत्‍याचार करतात, त्‍याची बरीच कारणं आहेत. सर्वात अधिक असणारं कारण म्हणजे जमिनींचे वाद. राज्‍याने आदिवासींना जमिनी दिल्‍या, तेव्‍हा रोजीरोटीसाठी त्‍यांचं जमीनदारांवर अवलंबून असणं कमी झालं आणि त्‍यामुळे गावातल्‍या जमीनदारांच्‍या वर्चस्‍वाला धक्‍का लागला.

२००२ मध्ये दिग्विजय सिंह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते तेव्‍हा साडेतीन लाख भूमीहीन दलित आणि आदिवासी यांना सक्षम करण्‍यासाठी त्‍यांना जमिनी देण्‍याचं आश्‍वासन दिलं गेलं होतं. मधल्‍या काळात काही जणांना त्‍या त्‍या जमिनींची आवश्‍यक ती कागदपत्रं मिळाली, पण बहुसंख्य केसेसमध्ये जमिनींचा प्रत्यक्ष ताबा मात्र अजूनही उच्‍चजातीय जमीनदारांकडेच आहे.

वंचित जमातींनी जेव्‍हाजेव्‍हा आपला हक्‍क सांगितला आहे, तेव्‍हातेव्‍हा त्‍यांना त्‍यासाठी आपल्‍या प्राणाची किंमत चुकती करावी लागली आहे.

जून २०२२ मध्ये गुना जिल्ह्यातल्‍या धनोरिया गावात रामप्‍यारी सहरियाच्‍या मालकीच्या जमिनीची आखणी करण्यासाठी सरकारी कर्मचारी आले होते. सीमा आखून झाल्‍या, तो क्षण रामप्‍यारींसाठी स्‍वप्‍न प्रत्यक्षात आल्‍याचा क्षण होता. त्‍या खुश होत्‍या. त्‍यांच्‍या सहरिया आदिवासी कुटुंबाने मालकीची जमीन मिळण्‍यासाठी दोन दशकं दिलेल्‍या लढ्याचा तो विजय होता.

पण ती जमीन दोन उच्‍च जातीच्‍या, धाकड आणि ब्राह्मण कुटुंबांच्‍या ताब्‍यात होती.

Jamnalal's family belongs to the Sahariya Adivasi tribe. He is seen here chopping soyabean in Dhanoriya.
PHOTO • Parth M.N.

जमनालाल सहरिया आदिवासी आहे . धनोरिया गावातल्‍या शेतात ते सोयाबीन काढताना दिसत आहेत

२ जुलै २०२२ या दिवशी रामप्‍यारी आपली तीन एकर जमीन बघायला गेल्‍या, मोठ्या अभिमानाने. आता त्‍या जमिनीच्‍या मालक झाल्‍या होत्‍या. त्‍या शेतजमिनीवर पोहोचल्‍या, तर तिथे जमीन ताब्‍यात असलेली दोन कुटुंबं ट्रॅक्‍टरने जमीन नांगरत होती. रामप्‍यारींनी त्‍यांना तिथून जायला, जमीन खाली करायला सांगितलं. ते अर्थातच तयार नव्‍हते. वादावादी सुरू झाली. त्‍या कुटुंबांनी रामप्‍यारींना मारलं आणि जाळून टाकलं.

‘’शेतावर काय घडलं हे आम्हाला कळलं तेव्‍हा तिचा नवरा, अर्जुन शेताकडे धावला. तिथे रामप्‍यारी जळालेल्या अवस्थेत पडली होती,’’ जमनालाल सांगतात. ७० वर्षांचे जमनालाल अर्जुनचे काका आहेत. ‘‘आम्ही ताबडतोब तिला गुनाच्‍या जिल्‍हा रुग्‍णालयात नेलं, पण तिची प्रकृती गंभीर असल्‍यामुळे तिथून तिला भोपाळला पाठवण्‍यात आलं.’’

कुटुंबीयांनी रामप्‍यारींना भोपाळला नेलं, पण सहा दिवसांनी त्‍यांचं निधन झालं. त्‍या ४६ वर्षांच्‍या होत्‍या. त्‍यांचा नवरा आहे, चार मुलं आहेत. सर्व मुलांची लग्‍न झाली आहेत.

ह्या संपूर्ण कुटुंबाची गुजराण मजुरीतून मिळणार्‍या पैशावर होत होती. ‘‘दुसरा कुठलाही मिळकतीचा आधारच नव्‍हता आम्‍हाला,’’ धनोरियाच्‍या शेतातलं सोयाबीन काढता काढता जमनालाल सांगतात. ‘‘शेवटी जेव्‍हा ही जमीन आमच्‍या ताब्‍यात मिळाली, तेव्‍हा आम्हाला वाटलं होतं की चला, आता आपण आपल्‍या खाण्यापुरतं धान्‍य तरी पिकवू शकू.’’

पण ती घटना घडल्‍यावर भीतीने रामप्‍यारीच्‍या कुटुंबाने धनोरिया गाव सोडलं आहे. जमनालाल अजून गावात राहातात, पण रामप्‍यारीचं कुटुंब कुठे राहातं, हे ते सांगत नाहीत. ‘‘आम्ही सारे याच गावात जन्‍मलो, इथेच वाढलो,’’ ते म्हणतात. ‘‘पण आता केवळ मीच या गावात मरेन. मला नाही वाटत अर्जुन आणि त्‍याचे वडील गावात परत येतील.’’

रामप्‍यारींच्‍या खुनाच्‍या गुन्‍ह्‍यात पाच जणांना अटक करण्‍यात आली आहे, त्‍यांच्‍यावर आरोप ठेवण्‍यात आले आहेत. पोलिस आले आणि त्‍यांनी मोठ्या तत्‍परतेने या अटका केल्‍या.

Jamnalal continues to live and work there but Rampyari's family has left Dhanoriya. 'I don’t think Arjun [her husband] and his father will return,' he says
PHOTO • Parth M.N.
Jamnalal continues to live and work there but Rampyari's family has left Dhanoriya. 'I don’t think Arjun [her husband] and his father will return,' he says
PHOTO • Parth M.N.

जमनालाल अद्याप धनोरिया गावात राहातात, तिथेच काम करतात. पण रामप्‍यारीच्‍या कुटुंबाने मात्र गाव सोडलं. ‘मला नाही वाटत आता अर्जुन (रामप्‍यारीचा नवरा) आणि त्‍याचे वडील इथे परत येतील,’ ते म्हणतात

*****

कोणी अत्‍याचार केला की त्‍या अत्‍याचाराला बळी पडणारे लोक न्‍याय मिळवण्‍यासाठी राज्‍य यंत्रणेकडे जातात. चैन सिंगच्‍या बाबतीत मात्र भलतंच घडलं… राज्‍य यंत्रणेनेच त्‍याचा घास घेतला!

ऑगस्‍ट २०२२ मधली गोष्ट. मध्य प्रदेशच्‍या विदिशा जिल्ह्यातल्‍या रायपुरा गावाजवळ घडलेली. चैन सिंग आणि त्‍याचा भाऊ महेंद्र सिंग  गावाजवळच्‍या जंगलातून मोटरसायकलवर परतत होते. ‘‘घराच्‍या कामासाठी आम्हाला थोडंसं लाकूड लागणार होतं,’’ वीस वर्षांचा महेंद्र सांगतो. ‘‘माझा भाऊ बाइक चालवत होता, आम्हाला जेवढं लाकूड गोळा करता आलं होतं. तेवढं सांभाळत मी मागे बसलो होतो.’’

रायपुरा गाव दाट जंगलाजवळ वसलं आहे. त्यामुळे, सूर्य मावळल्‍यावर इथे खूप काळोख होतो. या भागात रस्‍त्‍यावर दिवेही नाहीत. खडबडीत रस्‍त्‍याने येताना या दोघा भावांना केवळ बाइकच्‍या हेडलाइट्‌सचा आधार होता.

जंगलातला तो रस्‍ता काळजीपूर्वक पार केल्‍यावर चैन सिंग आणि महेंद्र मुख्य रस्‍त्‍यावर पोहोचले. तिथे अगदी समोरच वनरक्षकांच्‍या दोन जीप उभ्या होत्‍या. चैन सिंगच्‍या बाइकचा हेडलाइट थेट त्‍या जीपवर पडत होता.

‘‘माझ्‍या भावाने ताबडतोब बाइक थांबवली,’’ महेंद्र सांगतो. ‘‘पण एका वनरक्षकाने आमच्‍यावर गोळी झाडली. आम्ही काहीच केलं नव्‍हतं, फक्‍त लाकडं घेऊन चाललो होतो.’’

तिशीच्‍या चैन सिंगचा जागीच मृत्‍यू झाला. त्‍याचं बाइकवरचं नियंत्रण सुटलं आणि तो खाली पडला. मागे बसलेल्‍या महेंद्रलाही गोळी लागली. त्‍यांनी गोळा केलेलं लाकूड त्‍याच्‍या हातातून सुटून इतस्‍ततः विखुरलं आणि बेशुद्ध होण्‍याआधी तो बाइकसह खाली कोसळला. ‘‘मला वाटलं, मीही मरणार आता,’’ महेंद्र सांगतो. ‘‘मला वाटलं, मी स्‍वर्गात विहरतो आहे.’’ त्‍यानंतर त्‍याला आठवतंय ते रुग्‍णालयात जाग आली तेव्‍हाचं.

Mahendra's (in the photo) brother Chain Singh was shot dead by a forest guard near their village Raipura of Vidisha district
PHOTO • Parth M.N.

विदिशा जिल्ह्यातल्‍या रायपुरा गावाजवळ महेंद्रचा (छायाचित्रात दिसत असलेला) भाऊ चैन सिंह याची वनरक्षकांनी गोळी घालून हत्‍या केली

या घटनेची न्‍यायालयीन चौकशी सुरू आहे, असं विदिशाचे जिल्‍हा वनाधिकारी ओंकार मसकोले यांनी सांगितलं. ते म्हणाले, ‘‘आरोपीला निलंबित केलं होतं, पण आता तो पुन्‍हा सेवेत आला आहे. न्‍यायालयीन चौकशीचा अहवाल आला की आम्ही त्‍याच्‍यावर योग्‍य ती कारवाई करू.’’

आपल्‍या भावाला गोळी घालणार्‍या वन रेंजरला दोषी ठरवलं जाईल का, याबद्दल महेंद्रला शंका आहे. ‘‘मला वाटतं त्‍याने जे केलं आहे, त्‍याचे परिणाम त्‍याने भोगायलाच हवेत. नाहीतर तुम्‍ही काय संदेश देणार यातून? कोणत्‍याही आदिवासीला मारलं तर काही हरकत नसते? आमचं आयुष्य एवढं स्‍वस्‍त आहे का?’’ महेंद्र सवाल करतो.

या घटनेमुळे चैन सिंगचं कुटुंब उद्‌ध्वस्‍त झालं. चैन सिंग घरातल्‍या दोन कमावत्‍या सदस्‍यांपैकी एक होता. दुसरा होता महेंद्र, जो आज वर्षभरानंतरही लंगडत चालतो. ‘‘माझा भाऊ तर गेला, मीही या दुखापतीमुळे फार काम करू शकत नाही,’’ तो म्हणतो. ‘‘भावाची चार छोटी मुलं आहेत. कोण बघणार त्‍यांच्‍याकडे? आमची एक एकर जमीन आहे. तिथे आम्ही आमच्‍यापुरतं चण्‍याचं पीक घेतो. गेल्‍या वर्षभरात घरात पैसाच आलेला नाही.’’

*****

भारती त्‍या घटनेनंतर कसलीही कमाई करू शकलेली नाही.

नेमावरमध्ये तिच्‍या कुटुंबाचं हत्‍याकांड झालं, त्‍यानंतर वडील मोहनलाल आणि मोठा भाऊ संतोष यांच्‍यासह तिने गाव सोडलं. ‘‘आमची काही तिथे जमीन नव्‍हती, आमचं कुटुंबच होतं फक्‍त,’’ भारती सांगते. ‘‘तेच राहिलं नाही, तर गावात राहून काय करणार? तिथे राहिलं की सगळं आठवत राहायचं आणि शिवाय आम्हाला सुरक्षितही वाटायचं नाही तिथे.’’

Bharti's father and brother wanted to let go of the case and start afresh. 'Maybe they are scared. But I want to ensure the people who killed my family get punishment. How can I start afresh when there is no closure?' she says.
PHOTO • Parth M.N.

भारतीचे वडील आणि भाऊ यांना वाटतं की ही घटना मागे टाकून आता नव्‍याने सुरुवात करावी. ‘ते घाबरत असतील कदाचित. पण मला मात्र माझ्‍या कुटुंबाला मारणार्‍या माणसांना शिक्षा व्‍हायला हवी आहे. अद्याप न्‍यायच मिळालेला नाही, तर नवी सुरुवात कशी करणार?’ ती म्हणते

तेव्‍हापासून भारतीचं मोहनलाल आणि संतोष यांच्‍याबरोबर पटत नाही. ते तिघं एकत्र राहात नाहीत. ‘‘मी इथे इंदूरमध्ये आमच्‍या एका नातेवाइकांकडे राहाते आणि ते पिठमपूरला राहातात,’’ ती सांगते. ‘‘माझे वडील आणि भाऊ यांना ही झालेली घटना मागे टाकून नव्‍याने सुरुवात करावी, असं वाटतंय. ते घाबरत असतील कदाचित. पण मला मात्र माझ्‍या कुटुंबाला मारणार्‍या माणसांना शिक्षा व्‍हायला हवी आहे. अद्याप न्‍यायच मिळालेला नाही, तर नवी सुरुवात कशी करणार?’’

रुपालीला डॉक्‍टर व्‍हायचं होतं. पवनला लष्करात जायचं होतं. आपल्‍या भावंडांना दोन वेळचं अन्‍न मिळावं म्हणून प्रसंगी रस्‍त्‍यावर भीकही मागितलेल्‍या भारतीला मात्र फक्‍त न्‍याय हवा आहे, बाकी कसला ती विचारच करू शकत नाही.

जानेवारी २०२२ मध्ये भारतीने नेमावर ते भोपाळ अशी ‘न्‍याय यात्रा’ काढली. १५० किलोमीटरची ही पदयात्रा आठवडाभर सुरू होती. विरोधी पक्षाचा, म्हणजेच काँग्रेसचा त्‍याला पाठिंबा होता. मोहनलाल आणि संतोष त्‍यात सामील झाले नाहीत. ‘‘ते माझ्‍याशी बोलतही नाहीत जास्‍त,’’ भारतीच्‍या डोळ्यांत पाणी येतं. ‘‘मी कशी आहे, हेही नाही विचारत कधी.’’

कुटुंबातल्‍या मृतांसाठी मध्य प्रदेश सरकारने भारतीच्‍या कुटुंबाला ४१ लाख रुपये नुकसानभरपाई दिली. या रकमेचे तीन हिस्‍से केले गेले. एक भारतीचा, दुसरा मोहनलाल आणि संतोषचा, तर तिसरा भारतीच्‍या काकांच्‍या कुटुंबाचा. भारती सध्या याच पैशांवर जगते आहे. तिची नोकरी गेली, कारण या घटनेनंतर ती कामाकडे लक्षच देऊ शकत नव्‍हती. आता तिला पुन्‍हा शाळेत जायचंय, कुटुंबाच्‍या मदतीसाठी अर्ध्यात सोडलेलं शिक्षण पूर्ण करायचंय. पण हे सगळं केसचा निकाल लागल्‍यावरच.

भारतीला भीती वाटते आहे की सुरेंद्रचे राजकीय लागेबांधे असल्‍यामुळे त्‍याच्‍यावरची केस कमजोर होईल. असं होऊ नये म्हणून भारती चांगल्‍या आणि विश्‍वसनीय वकिलांना भेटते आहे. गेल्‍या दोन वर्षांत भारतीच्‍या आयुष्यातल्‍या सगळ्या गोष्टी बदलल्‍या, एक सोडून : ती अजूनही आपल्‍या कुटुंबाचाच विचार करते आहे.

Parth M.N.

Parth M.N. is a 2017 PARI Fellow and an independent journalist reporting for various news websites. He loves cricket and travelling.

Other stories by Parth M.N.
Editor : PARI Desk

PARI Desk is the nerve centre of our editorial work. The team works with reporters, researchers, photographers, filmmakers and translators located across the country. The Desk supports and manages the production and publication of text, video, audio and research reports published by PARI.

Other stories by PARI Desk
Translator : Vaishali Rode

Vaishali Rode is an independent journalist and a writer with prior experience in Marathi print media. She has penned the autobiography of a transgender, MI HIJDA MI LAXMI, which has been translated in many languages.

Other stories by Vaishali Rode