महाराष्ट्र-कर्नाटक-गोव्याच्या सीमेवर असलेल्या अतिशय मनोरम अशा तिल्लारीच्या जंगल भागातून आम्ही चाललो होतो. या जंगलात आणि आजूबाजूला असलेल्या धनगरपाड्यांवर जाऊन तिथे राहणाऱ्या धनगर बायांच्या आरोग्याच्या समस्या आम्हाला जाणून घ्यायच्या होत्या. तिल्लारीहून चंदगडला जात असताना वाटेत झाडाखाली एक पन्नाशीच्या बाई हातात पुस्तक घेऊन बसलेल्या आम्हाला दिसल्या.

मे महिन्याची दुपार होती. आभाळ भरून आलेलं होतं. पुस्तक वाचणाऱ्या या मावशी पाहून आम्ही चकित; झालो. गाडी थांबवली आणि मागे चालत आलो. त्यांचं नाव रेखा रमेश चंदगड. विठोबाच्या भक्त. आम्ही त्यांच्याशी बोललो. आमच्या विनंतीला मान देत त्यांनी संत नामदेवांचा एक अभंग गाऊन दाखवला. महाराष्ट्रात आणि नंतर पंजाबात प्रसिद्ध असलेले नामदेव भक्ती पंथाचे संत. कर्मकांडाला फाटा देऊन धार्मिक क्षेत्रातलं बडव्यांचं वर्चस्व मोडून काढण्याचं, नामस्मरणाचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या संतांची ही भक्ती परंपरा. रेखाताई त्याच भक्तीपंथाच्या वारकरी.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक दर वर्षी आषाढी आणि कार्तिकी अशा दोन वाऱ्या करतात. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेवांसारख्या संतांचे अभंग गात चालत पंढरपूर गाठतात. रेखाताई देखील दर वर्षी न चुकता पंढरीला जातात.

“माझी पोरं म्हणतात, ‘कशाला बकऱ्यांमागे जाते? सुखात घरी बस.’ पण मला इथे यायला आवडतं. विठ्ठलाचं नाव घ्यावं. भजन गावं. वेळ भुर्रकन जातो. मन आनंदाने भरून येतं,” रेखाताई सांगतात. दिवाळीनंतर कार्तिक वारीला जाण्याचे वेध त्यांना आतापासूनच लागले आहेत.

व्हिडिओ पहाः शेळ्या राखाव्या, गाणी गावी

Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Marathi Translations Editor at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale
Text Editor : S. Senthalir

S. Senthalir is Senior Editor at People's Archive of Rural India and a 2020 PARI Fellow. She reports on the intersection of gender, caste and labour. Senthalir is a 2023 fellow of the Chevening South Asia Journalism Programme at University of Westminster.

Other stories by S. Senthalir