“मिरची में आग लग गई.”
२ डिसेंबर १९८४ ची रात्र. भोपाळमध्ये राहणारी नुसरत जहाँ श्वास कोंडून जागी झाली. डोळ्याची प्रचंड आग होत होती आणि पाणी यायला लागलं होतं. तिचं सह वर्षांचं मूल रडायला लागलं. त्या आवाजाने तिचा नवरा मुहम्मद शफीक जागा झाला.
“कयामत का मंज़र था,” आता सत्तरीचे असलेले शफीक चाचा सांगतात. नवाब कॉलनीमधल्या त्यांच्या घरी आम्ही बोलत होतो. मध्य प्रदेशाच्या राजधानीवर आलेल्या भोपाळ वायू दुर्घटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आपत्तीच्या आठवणी ते सांगत होते. आज त्या घटनेला ४० वर्षं पूर्ण होतायत.
एका कागदाच्या कारखान्यात शफीक चाचा रोजंदारीवर काम करत होते. त्या दुर्घटनेनंतरची अनेक वर्षं या विषारी वायूमुळे झालेले परिणाम त्यांनी भोगले, त्यावर उपचार घेण्यासाठी इथे तिथे खेटा मारल्या. पाण्याचा एकमेव स्रोत असलेल्या त्यांच्या विहिरीचं पाणी दूषित होतं आणि १८ वर्षं ते तेच पाणी वापरत होते. त्यानेही परिस्थिती अधिक वाईट झाली. पाण्याने डोळे चुरचुरायचे, ते सांगतात. पण तेवढा एकच स्रोत होता. २०१२ साली संभावना क्लिनिकने पाण्याची तपासणी केली तेव्हा त्यामध्ये विषारी घटक असल्याचं समजलं. त्यानंतर त्या परिसरातल्या बोअरवेल सरकारने बंद केल्या होत्या.
१९८४ च्या त्या काळरात्री शफीक चाचा आणि इतर हजारो लोकांच्या घरात जो विषारी वायू शिरला तो युनियन कार्बाईड इंडिया लिमिटेड (यूसीआयएल) या कंपनीतून आला होता. तेव्हा या कंपनीची मालकी युनियम कार्बाईड कॉर्पोरेशन या बहुराष्ट्रीय कंपनीकडे होती. २ डिसेंबरच्या रात्री वायुगळती झाली. अत्यंत विषारी असलेल्या मेथिल आयसोसायनाइटची यूसीआयएलच्या कारखान्यातून गळती सुरू झाली. जगभरातल्या औद्योगिक आपत्तींमधली सर्वात भयानक आपत्ती त्यानंतर अवतरली.
“अधिकृत सूत्रांच्या सांगण्यानुसार जीवितहानीचा आकडा २,५०० सांगितला जात असला तरी इतर काही अहवालांमध्ये (दिल्ली सायन्स फोरम) हा आकडा याच्या किमान दुप्पट असल्याची नोंद आहे,” द लीफलेट मधल्या या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
हा विषारी वायू संपूर्ण भोपाळ शहरावर पसरला आणि कंपनीच्या जवळ राहणाऱ्या शफीक चाचांसारख्यांना त्याचा सगळ्यात जास्त फटका बसला. शहराच्या ३६ प्रभागांमधल्या तब्बल सहा लाख लोकांना वायूची झळ बसली.
आपल्या मुलाला उपचार मिळावेत म्हणून चाचा आधी हमीदिया हॉस्पिटलला पोचले. त्यांच्या घरापासून दवाखाना एक किलोमीटरवर होता.
“लाशें पडी हुई थी वहाँ पे,” ते सांगतात. उपचारासाठी शेकडो लोकांच्या रांगा लागल्या होत्या. डॉक्टर इतर स्टाफ पुरता भांबावून गेला होता, काय करायचं हेच समजायला मार्ग नव्हता.
“माथे पे लिख देते थे,” प्रेतांची संख्या वाढू लागल्यावर दवाखान्यात अशा रितीने नोंदी ठेवू लागले, चाचा सांगतात.
इमामी गेटजवळ असलेल्या हॉस्पिटलमधून काही तरी खायला म्हमून शफीक चाचा बाहेर पडले आणि काही तरी अवचित त्यांच्या नजरेस पडलं. त्यांनी खाणं मागवलं, त्यातलं वरण पूर्ण निळं झालं होतं. “रात की दाल है भैया,” तिथला माणूस म्हणाला. विषारी वायूने तिचा रंग बदलून गेला होता आणि चवही आंबट झाली होती.
“अत्यंत विषारी असलेल्या रसायनांचा एवढा मोठा साठा केल्यास काही आपत्ती घडू शकते यासंबंधीच्या सगळ्या इशाऱ्यांकडे यूसीसीचे अधिकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी ज्या प्रकारे पूर्णपणे दुर्लक्ष केलं ते सौम्य शब्दांत सांगायचं तर धक्कादायक आहे,” एन. डी. जयप्रकाश द लीफलेटमध्ये लिहितात. ते दिल्ली सायन्स फोरमचे सचिव असून अगदी पहिल्या दिवसापासून या घटनेचा मागोवा घेत आहेत.
भोपाळ वायूगळती झाली आणि त्यानंतर त्याने बाधित कुटुंबांना योग्य भरपाई मिळावी यासाठीची कायदेशीर लढाई गेली अनेक दशके सुरूच आहे. ज्यांना या वायूचा त्रास झाला त्यांच्या वैद्यकीय कागदपत्रांचं डिजिटायझेशव व्हावं यासाठीही लढा सुरू आहे. यूसीसीची संपूर्ण मालकी आता ज्या कंपनीकडे आहे त्या डाउ केमिकलविरोधात १९९२ साली आणि यूसीआयएल आणि तिच्या अधिकाऱ्यांविरोधात २०१० साली असे दोन फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. दोन्ही खटले भोपाळ जिल्हा न्यायालयात प्रलंबित आहेत, जयप्रकाश सांगतात.
२०१० साली या आपत्तीग्रस्तांनी भोपाळ ते दिल्ली पायी मोर्चा काढला होता. या दिल्ली चलो आंदोलनात शफीक चाचा सहभागी झाले होते. “इलाज, मुआवजा और साफ पानी के लिये था,” ते सांगतात. अडतीस दिवस ते देशाच्या राजधानीत जंतर मंतरवर धरणं देऊन बसून राहिले. त्यांनी पंतप्रधानांच्या निवासात शिरण्याचाही प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांना अटक केली.
“आपत्ती ग्रस्त आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रामुख्याने दोन प्रकारचे खटले आहेत. एक सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि एक जबलपूरच्या मध्य प्रदेश उच्च न्यायालयात,” एन. डी. जयप्रकाश सांगतात. ते भोपाल गॅस पीडित संघर्ष समितीचे सह-निमंत्रक आहेत.
*****
“पेड काले हो गये थे, पत्ते जो हरे थे, नीले हो गये, धुआँ था हर तरफ,” ताहिरा बेगम सांगतात. संपूर्ण शहराला स्मशानभूमीचं रुप आलं होतं, त्या म्हणतात.
“ते [वडील] घराच्या व्हरांड्यात झोपले होते,” ताहिरा आपा सांगतात. “तेव्हाच खराब हवा वाहू लागली. खोकत खोकतच ते उठले. त्यांना हमीदिया हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.” तीन दिवसांनी त्यांना घरी सोडलं, “पण त्यांचा श्वासाचा त्रास पूर्ण बरा झालाच नाही. तीन महिन्यातच ते वारले,” आपा सांगतात. त्यांच्या कुटुंबाला ५०,००० रुपये नुकसान भरपाई मिळाली. कोर्टामध्ये सुरू असलेल्या खटल्यांबाबत त्यांना फारशी माहिती नाही.
ही घटना घडल्यानंतर लोकांनी प्रेतं दफन करण्यासाठी मोठे खड्डे खणले आणि सामूहिक दफन केलं. अशाच एका खड्ड्यामध्ये तिची आत्याही होती. आणि ती जिवंत होती. “आमच्या एक नातेवाइकाने तिला ओळखलं आणि बाहेर ओढून काढलं,” त्या सांगतात.
ताहिरा बेगम शक्तीनगरच्या अंगणवाडीत गेल्या ४० वर्षांहून जास्त काळ काम करतायत. ही वस्ती यूसीआयएलपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. या दुर्घटनेच्या एका वर्षानंतर त्यांनी इथे काम करायला सुरुवात केली.
वडलांचे दफनविधी झाल्यानंतर हे कुटुंब झाशीला रहायला गेलं. २५ दिवसांनी ते परत आले तेव्हा, “फक्त कोंबड्या जिवंत होत्या. बाकी सगळी जनावरं मरून गेली होती,” ताहिरा सांगता.
शीर्षक आणि इतर छायाचित्रः स्मिता खटोर
अझीम प्रेमजी युनिवर्सिटीच्या प्रा. सीमा शर्मा आणि प्रा. मोहित गांधी यांनी या वार्तांकनासाठी बहुमोल मार्गदर्शन केलं आहे. त्यांचे आभार.